मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत (Agriculture Irrigation Scheme) वैयक्तिक शेततळे (Farm Pond Scheme) घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’च्या www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या (Agriculture Department) वतीने करण्यात आले आहे.
‘महाडीबीटी’ च्या संकेतस्थळावर ‘वैयक्तिक शेततळे’ ही बाब कार्यान्वित करण्यात आलेली असून, याकरिता शेतकऱ्यांनी अर्ज करताना ‘सिंचन साधने व सुविधा’ या टॅबअंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ या बाबीची निवड करावी.
Farm Pond Scheme
त्यानंतर ‘इनलेट आणि आउटलेटसह’ किंवा ‘इनलेट आणि आउटलेट शिवाय’ यापैकी एका उपघटकाची निवड करावी. त्यानंतर ‘शेततळ्याचे आकारमान’ व ‘स्लोप’ची निवड करावी. अर्ज भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टलद्वारे लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
‘वैयक्तिक शेततळे’ घटकासाठी पुणे जिल्ह्याला २०२२-२३ या वर्षासाठी ४ कोटी ८० लाख रुपये इतक्या रकमेचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी जवळच्या मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.